च्यवनप्राश हे एक रसायन औषध आहे. च्यवनप्राशचा उल्लेख सर्वप्रथम चरकाचार्यांनी आपल्या चरक संहितेत केलेला आढळतो.
।। लाभोपायो हि शस्तानां रसादीनां रसायनं ।।
– म्हणजे प्रशस्त गुणांनी युक्त रसरक्तादि धातु प्राप्त करण्यासाठी जे जे उपाय केले जातात त्यांना रसायन असे म्हणतात.
- च्यवनप्राश मधील मूख्य घटक म्हणजे आवळा. आवळा हा अत्यंत गुणकारी, त्रिदोष शामक फल अहे. त्यातील इतर घटक द्रव्य जशी मानुका, गोक्षुर, हिरडा, जीवक, ऋषभक,गोघृत, मध, विदारी, हि सर्व औषधे शरिरातील दोष दूर करून, शरीर धातुंचे बल, उर्जा, वृद्धी, आणि चैतन्य निर्माण करुन शरिराचे वर्धन करतात.
- शरिराचे बल, अग्नि आणि आरोग्य हे हेमंत आणि शिशीर ऋतुमध्ये (हिवाळ्यात) अतिशय उत्तम असते, तसेच च्यवनप्राश हा अल्पशः उष्ण असतो, शिवाय ऊत्तम प्रतीचा आवळा पण ह्या काळात उपलब्ध असल्याने, च्यवनप्राश हिवाळ्यात सेवन करण्याचा नेम आहे.
च्यवनप्राश सेवन केल्याचे फायदे :
- क्षीण, क्षत, वृद्ध आणि बालक यांच्या शरिर अवयवांची वाढ करणारे रसायन आहे.
- खोकला आणि दमा ह्यासाठी ऊत्तम रसायन आहे.
- हॄदयासाठी बल्य
- मूत्राशय आणि शुक्राशयातील दोष दूर करते.
- च्यवनप्राश निरंतर सेवन केल्यास बुद्धि, स्मृति, कांति, अग्नि, आयष्य वाढते.
- सौंदर्य टिकून राहते आणि वार्धक्य उशीरा येते.
च्यवनप्राश सेवन काल आणि विधि :
- च्यवनप्राश चे प्रमा्ण हे आपली प्रकृति, वय, आणि वैद्यांच्या सल्ल्यानुसार ठरवावी.
- सामान्यतः निरोगी तरुण व्यक्तिने सकाळी अनोशापोटी, रसायन कालात १ मोठा चमचा च्यवनप्राश अवलेह चाटून खावे.
- उष्ण ऋतु अथवा उष्ण प्रकृतिच्या लोकांमध्ये च्यवनप्राशची मात्रा कमी असावी.
- अधिक फायद्या करीता त्यासोबत १ लहान चमचा तूप सेवन करावे.
- च्यवनप्राश सेवनानंतर, पुढे काही काळ छान भूक लागल्याखेरीज काहिही खाऊ नये.
- च्यवनप्राश सोबत किंवा लगेच किमान १ तास नंतर कधिहि दूध प्राशन करु नये. च्यवनप्राशमध्ये मुख्य घटक आवळा आहे, जो मुळात आंबट रसाचा आहे, त्यासोबत दुध घेतल्यास ते विरुद्ध आहार ठरतो, असे हे विरुद्ध नित्य सेवन केल्यास फायद्यापेक्षा अपायच अधिक होतील.